‘महाराष्ट्राचा भाषिक नकाशा: पूर्वतयारी’ (२०१३) या पूर्वी झालेल्या भाषिक सर्वेक्षणामध्ये व्याही आणि विहीण या नातेवाचक शब्दांसाठी बोलींमध्ये फार थोडे वैविध्य असल्याची नोंद आहे. व्याही शब्दासाठी ईवाई/विवाई इतकेच वैविध्य तर विहीण शब्दासाठी एकही शब्दाची नोंद नाही. सद्य सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे वैविध्य सापडले आहे. यीन, विहीन, इन, याहीन, यीहीन, समधिन, येहणीस, सोयरी, विहानिस इ. शब्दवैविध्य आढळते. यांपैकी याहीन, यीहीन हे शब्द प्रामुख्याने धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव या भौगोलिक प्रदेशात, तर येहणीस, विहानिस हे शब्द कातकरी समाजात वापरले जातात. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत सोयरी हा शब्द प्रामुख्याने वापरला जातो. अन्य सर्व प्रदेशांमध्ये यीन, विहीन, वेन, विन अशाप्रकारचे ध्वन्यात्मक भेद आढळतात. व्याही शब्दाकरता ईवाई, इवाय, व्याई, युवाय, सोयरे, विहीस, याहास, यहानास, विहा इ. शब्दवैविध्य आढळते. यापैकी रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सोयरे आणि धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये तसेच अन्य जिल्ह्यांमधील कातकरी समाजामध्ये विहीस, याहास, यहानास, विहा हे शब्द आढळतात.