मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

सूर्य उगवण्याची दिशा आणि सूर्य मावळण्याची दिशा

डाउनलोड सूर्य उगवण्याची दिशा आणि सूर्य मावळण्याची दिशा

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

मराठी भाषेतील दिशादर्शक शब्दांकरता बोलींमध्ये बरेच वैविध्य दिसून येते. भौगोलिकदृष्ट्या त्या प्रदेशाची रचना आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन (worldview) या दोन गोष्टींचा प्रभाव दिशादर्शक शब्दांच्या रचनेत दिसून येतो. सूर्य खालच्या दिशेने उगवतो आणि वरच्या दिशेने मावळतो हा दृष्टीकोन सर्वेक्षणातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिसून आला. ‘सूर्य उगवण्याची दिशा’ या संकल्पनेसाठी पूर्व, खालतं, उगवत, खाल्लाकड, उगवती, खालती, हेट्टा, हेट्या, खाल्यांग, खालतीकडं, खालत्याली, सूर्यमुख, गंगेकडं, गंगाम्होरं, सूर्यदयी, सूर्यमोहरी, माडेवाच्या तोंडी, सूर्यतळ, सूर्यसंबर, , इ. शब्दवैविध्य सापडले. ‘सूर्य मावळण्याची दिशा’ या संकल्पनेसाठी पश्चिम, वरती, मावलत, वरतीकड, मावळती, वरा, वरल्यांग, दिन बुडती, रक्साकड, नमतं, उपराल, वरी, राकीसम्होरं, हातमान्गाकडे तसेच डोंगरमोहरी इ. शब्दवैविध्य सापडले.

यापैकी हेट्या, येट्या, वरा हे शब्द प्रामुख्याने धुळे जिल्हा, नाशिक जिल्ह्यामधील नाशिक, सटाणा आणि सुरगणा तालुका, नंदुरबार जिल्हा, आणि जळगाव जिल्ह्यामधील चोपडा तालुका या ठिकाणी आढळतात. त्यातही अहिराणी किंवा भिली या मातृभाषा असणाऱ्या भाषकांनी मुख्यतः हेट्या, येट्या, वरा हे शब्द वापरले आहेत. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांमध्ये पूर्व, पश्चिम आणि उगवती-मावळती हे शब्द प्रामुख्याने वापरले जातात. तर केवळ लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये गंगाम्होरं, राकीसम्होरं आणि गंगेकडं-रक्साकड हे शब्द सापडले, तर प्रामुख्याने अमरावती, जालना आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये पूर्व, खालती-वरती या शब्दांबरोबरच सूर्यमुख, सूर्यमोहरी, डोंगरमोहरी, सूर्यदयी, दिन बुडती, सूर्यतळ, नमतं, सूर्यसंबर इ. शब्दवैविध्य आढळते.

‘सूर्य उगवण्याची दिशा’ या संकल्पनेकरता वापरण्यात येणार्‍या शब्दांचे भौगोलिक आणि सामाजिक क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.

पूर्व हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. पूरब हा शब्द हिंदी भाषेतील शब्द महाराष्ट्रातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि नांदेड या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात सांगितला गेला आहे. प्रामुख्याने मराठी मातृभाषा नसणार्‍या गोंड, कोहळी, भालाई, कोष्टी इ. समाजातील भाषकांनी वापरलेला दिसतो. अपवादात्मक स्वरूपात कुणबी समाजातील काही सुशिक्षित आणि छत्तीसगडी, हिंदी भाषा बोलता येणार्‍या लोकांनी सांगितला आहे. खालतं हा शब्द प्रामुख्याने लातूर, जालना, परभणी, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये जास्त प्रमाणात वापरला जातो. याच शब्दाचे ध्वनिसाधर्म्य असलेले काही शब्द आढळतात. त्यामध्ये खालती हा शब्द प्रामुख्याने नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात वापरला जातो. खाली, खालतीकडं हे शब्द कोल्हापूर आणि सांगलीच्या मिरज तालुक्यात तर खायली हा शब्द शिराळा तालुक्यात वापरला जातो. उगवत हा शब्द सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांत तुरळक वापरला जातो. उंगवत हा शब्द ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या शब्दाचे उगवती, उंगवत, उगवतीची बाज़ू, उगळतं, उगावता, उंगत, उबुतं, उगुती इ. धन्यात्मक वैविध्य आढळून आले आहे. वरील जिल्ह्यांसह, पुणे, लातूर, औरंगाबाद, वाशिम, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत अतिशय तुरळक वापरला जातो. खाल्लाकडं हा शब्द प्रामुख्याने सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, बीड, नांदेड या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात वापरला जातो. खाल्यांगं आणि खाल्यांगी हे शब्द नाशिक, जळगाव, यवतमाळ, चंद्रपूर इ. जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात वापरला जातो. याशिवाय आणखी काही ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले आहे. त्यामध्ये खालत्याली, खालबी, खालना, खाल्वस, खाल्लाकुन, खाल्याबाजुला, खाली, खालं, खालते इ. हे शब्द अतिशय तुरळक प्रमाणात वापरले गेले आहेत. हेट्या हा शब्द धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांत वापरला जातो. अहिराणी मातृभाषा असणारे लोक हा शब्द वापरतात. या शब्दाचे येत्या, येट्या, हेट्या, हेठ्या, येतला, हेट्टा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

सूर्यमुखी हा शब्द जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात मराठा समाजात वापरला जातो. या शब्दाशी साम्य असणारे काही शब्द महाराष्ट्राच्या इतर भागात तुरळक प्रमाणात आढळून आले आहेत. सूर्यमोहरी आणि सूर्यतळ हे शब्द औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मिळाले आहेत. सूर्यसमुख हा शब्द नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गोलदरी गावातील वारली समाजातील भाषकांकडून मिळाला आहे. सूर्यासंबर हा शब्द अमरावती जिल्ह्यातील बौद्ध समाजातील लाडशी मातृभाषा असलेल्या भाषकांकडून मिळाला असून सूरुगम हा शब्द उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कसगी गावात कन्नड भाषा बोलता येणार्‍या लिंगायत समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे. सूर्य उगवती हा शब्द चंद्रपूर जिल्ह्यातील गोंड समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे.

गोम्यो हा शब्द अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजात वापरला जातो. धाडू/दहाडू हे शब्द जळगावच्या रावेर तालुक्यातील पायली समाजात वापरले जातात. तल्लाको हा शब्द जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाघारी गावातील तेली समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे. तल्ला म्हणजे तळ तल्लाको म्हणजे तळाला असा हा शब्द सांगितला गेला आहे. मादेवाच्या तोंडी हा शब्द यवतमाळच्या नेर तालुक्यातील कोलुरा गावातील प्रधान समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे. तर दिवस निंगती हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार या गावात कोहळी समाजातील भाषकांकडून सांगितला आहे.

‘सूर्य मावळण्याची दिशा’ या संकल्पनेकरता वापरण्यात येणार्‍या शब्दांचे भौगोलिक आणि सामाजिक क्षेत्र पुढीलप्रमाणे आहे.

पश्चिम हा शब्द संपूर्ण महाराष्ट्रात वापरला जातो. या शब्दाचे पचिम, पस्चिम, पचिमी, पछिम, पच्छिम, पक्शिम, पश्शिम, पच्चिम, पक्चिम, पच़शिम, पशिम, पक्छिम, पत्शिम इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

वरतं हा शब्द लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, अहमदनगर, नांदेड, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, औरंगाबाद, धुळे, जळगाव, पालघर, वर्धा, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात वापरला जातो. वरलाकड हा शब्द लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, पुणे, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली इ. जिल्ह्यांत वापरला जातो. वरतीकडे हा शब्द केवळ कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत वापरला जातो. वरा, वेरा हे शब्द धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांत वापरले जातात. वरल्यांग हा शब्द नाशिकच्या सटाणा आणि सुरगणा तालुक्यात वापरला जातो. वरलाकुन हा शब्द अहमदनगर, बीड, परभणी या जिल्ह्यांत वापरला जातो. वरवस हा शब्द भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील लोभी गावात कोहळी समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे. याशिवाय या शब्दाचे वर, वरती, वरी, वरतीकड, वरत्या, वर्‍या इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले.

मावळत हा शब्द प्रामुख्याने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत वापरला जातो. तसेच सातारा, सांगली आणि नाशिक या जिल्ह्यांतही तुरळक प्रमाणात वापरला जातो. या शब्दाचे मावलत, मावाळतं, माउळतं, मावळते इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. तर मावळती हा शब्द पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, या जिल्ह्यांत जास्त प्रमाणात आढळून आला. नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळून आला.

बुडती हा शब्द चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि नंदुरबार या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात वापरला गेला आहे. चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील कुणबी, चंद्रपूर तालुक्यातील गोंड आणि महार, नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल, नागपूर जिह्यातील माना आणि वर्धा जिल्ह्यातील गोंड या समाजात हा शब्दा वापरला गेला आहे. या शब्दाचे बुडती, बुडती बाज़ू, दिह बुडती, बुडता, दिवस बुडती, सुर्य बुडती इ. ध्वन्यात्मक वैविध्य सापडते.

राकीसमोरं हा शब्द लातूर, उस्मानाबाद, आणि यवतमाळ या जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात आढळतो. प्रामुख्याने लिंगायत, जंगम, प्रधान, धनगर, मराठा इ. समाजातील सुशिक्षित महिलांमध्ये हा शब्द जास्त प्रमाणात दिसला आहे. या शब्दाचे राक्समोरं, राक्साकड, रक्साकडं, राक्शिसाचा तोंडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

नमता हा शब्द पालघरमधील वारली समाजात वापरला जातो. उपराल/उपरांडा हे शब्द औरंगाबाद जिल्ह्यातील रजपुत भामटा, चमारू आणि मुस्लिम या समाजातील अशिक्षित व्यक्तींनी जास्त प्रमाणात सांगितले आहेत. हे सर्वच समाज अमराठी आहेत. तर हातमान्गाकडे हा शब्द उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील कसगी गावातील लिंगायत भाषकांकडून मिळाला आहे. डोंगरमुखी हा शब्द जळगाव, परभणी आणि जालना जिल्ह्यांत तुरळक प्रमाणात वापरला गेला आहे. मराठा समाजातील सुशिक्षित लोकांनी हा शब्द सांगितला आहे. या शब्दाचे डोंगरमोहरी, डोंगरतळ, डोंगराकड इ. ध्वन्यात्मक वैविध्य सापडले.

बाशयात बाजू हा शब्द रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोर्लई गावातील ख्रिश्चन भाषकांकडून मिळाला आहे. धाडु बुडे हा शब्द जळगाव जिल्ह्यातील पावरा/पायली समाजात वापरला जातो. नेल्लुचे/नेळो हा शब्द जळगाव जिल्ह्यातील पावरा समाजातील भाषकांकडून मिळाला आहे. डुबती हा शब्द भंडार्‍याच्या तुमसर तालुक्यातील लोभी गावातील कोहळी समाजाच्या व्यक्तीकडून् मिळाला आहे. डुपती हा शब्द भंडार्‍याच्या तुमसर तालुक्यातील बोरी गावातील माळी समाजाच्या भाषकांकडून मिळाला आहे. नमरुलाखे/गोमेनम्रुला/गोमयामरू हे शब्द अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजात वापरले जातात.