मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे

Download Utensil used for drinking water

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी. ‘पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वैविध्य आढळते. पेला, फुलपात्र, वाटी, संपुट, कप, कटोरी, जांब, लोटा, झाकन, चंबू, ग्लास, गंज, गडू, गडवा इ. शब्द प्रामुख्याने आढळून येतात. या शब्दाचा भौगोलिक विस्तार पुढीलप्रमाणे आहे.

पेला हा शब्द कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळून येतो तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दामध्ये पेलो, पॅला, प्याला, पॅली, प्येला, प्याली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

फुलपात्र हा शब्द प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त आढळून येतो. तसेच बुलढाणा जिल्ह्यात जास्त प्रमाणात दिसून येतो. कोकण विभागातील पालघर जिल्हा वगळता आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात आढळतो. विदर्भात अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यात क्वचितच आढळून येतो. या शब्दाचे फुलपातर इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

वाटी हा शब्द प्रामुख्याने कोल्हापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, वाशिम, पालघर, ठाणे या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. तर सांगलीच्या मिरज, सोलापूरच्या अक्कलकोट, उस्मानाबादच्या उमरगा, लातूरच्या निलंगा, उदगीर या तालुक्यात जास्त आढळून येतो. याचा अर्थ असा की कर्नाटक राज्याच्या सीमेलगतच्या भागात वाटी हा शब्द जास्त वापरल्याचे दिसून येते. उर्वरित महाराष्ट्रात हा शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे वाटा, वाटकी, वाटका, वाटको, वाटगी, वाटके, वाडगं इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

ग्लास हा शब्द उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्याचबरोबर मराठवाड्यातील नांदेड, औरंगाबाद, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड ह्या जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात आढळून येतो. याशिवाय उर्वरित महाराष्ट्रात हा शब्द तुरळक प्रमाणात दिसून येतो. या शब्दाचे ग्लास, गलास, गल्लास, गिलास, गिल्लास, गिलस, गल्ली इ. ध्वन्यात्मक वैविध्य पहावयास मिळते.

कप हा शब्द रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे ह्या जिल्ह्यात प्रामुख्याने आढळून येतो. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात आणि उर्वरीत महाराष्ट्रात बीड, लातूर, नांदेड, परभणी, औरंगाबाद, वाशिम, वर्धा, गोंदिया या जिल्ह्यात क्वचितच आढळून येतो. या शब्दाचे कोप हे ध्वनिवैविध्य प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसून येते.

संपुट हा शब्द जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव आणि नाशिकच्या मालेगाव तालुक्यातही आढळून येतो. या शब्दाकरिता ‘A casket, covered box’ असा अर्थ संस्कृत इंग्रजी शब्दकोशात (आपटे,१९८५) दिला गेला आहे. तसेच अन्य संस्कृत-इंग्रजी शब्दकोशात (विलियम्स, १९६०) ‘a hemispherical bowl or anything so shaped, The space between two bowls, a round covered case or box or casket’ असेही अर्थ सांगितलेले दिसतात.

फुलपात्राचा वापर काही प्रमाणात केवळ तांब्यावर झाकण म्हणून होत असल्यामुळे या संकल्पनेकरिता झ़ाकन हा शब्द रूढ झाला असावा. हा शब्द नागपूर, नाशिक, जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. कोकणात आणि मराठवाड्यातील लातूर, नांदेड, जालना या जिल्ह्यात हा शब्द तुरळक प्रमाणात वापरल्याचे आढळून आले आहे. भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यात हा शब्द काही प्रमाणात दिसून येतो तर सोलापूर जिल्ह्यात अपवादात्मक स्वरूपात अढळला आहे. या शब्दाचे झाकन, झाकड, जाक्कन, झापन, झ़ाकनी, झाकन, ढाकन इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

कटोरी हा शब्द विदर्भात तुरळक प्रमाणात आढळून येतो. तर बीडमधील मुस्लिम समाजात हा शब्द दिसून आला आहे. कटोरा, कटोरं, कटो, कटोरे, कटरा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले. तसेच करा हा शब्द कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यात आढळून आला आहे.

ज़ांब हा शब्द पालघर, नांदेड, बुलढाणा, वाशिम, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे जाम, जॅम हे ध्वन्यात्मक वैविध्य आढळते. तसेच जग हा शब्द अमरावती, वर्धा, नागपूर या जिल्ह्यात आढळून आला आहे.

प्रमाण मराठीत पाणी साठवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणार्या पात्राकरिता रूढ असणारा लोटा/लोटी हा शब्द ‘पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे भांडे‘ या संकल्पनेकरिता कोकणात मुस्लिम, ठाकूर, महादेव कोळी, वारली या समाजातील भाषकांमध्ये तर उत्तर महाराष्ट्रात महादेव कोळी, भिल्ल, तेली, वळवी, विदर्भात कोरकू, गोंड, बौद्ध, कुणबी या समाजातील भाषकांत आढळून आला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात बंजारा, आणि मराठा या समाजात सदर शब्द तुरळक प्रमाणात आढळून येतो. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात हा शब्द अपवादात्मक दिसून येतो.

चंबू या शब्दाचा वापर प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यात त्याचप्रमाणे मराठवाडा,खानदेशातील नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे. तसेच विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातही या शब्दाचा वापर आढळून आला आहे. या शब्दाचे च़ंबलू, चंबूलं, च़ंबू, चेंबू, चंगुली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

गंज हा शब्द विदर्भात तुरळक प्रमाणात तर मराठवाड्यात क्वचितच आढळून येतो. या शब्दाचे गंज़ं, गंजी, गंजुन्या, गंजीली, गंजुली, गुंजी इ. ध्वन्यात्मक वैविध्य पहावयास मिळते.

गडू हा शब्द नांदेड, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया या जिल्ह्यात तसेच चंद्रपूर, ठाणे या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात वापरलेला दिसतो. ह्या व्यतिरिक्त लातूर, धुळे, जळगाव या जिल्ह्यात या शब्दाचा वापर क्वचितच आढळतो. या शब्दाचे गट्टू, गडू, गढु, गुंडी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

गडवा हा शब्द वर्धा जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळून येतो. तसेच उर्वरित विदर्भात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे गडवा, गढवा, गळवा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

डवला हा शब्द धुळे, नंदुरबार, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात अनुक्रमे माळी, भिल्ल, कुणबी, धनगर, कुणबी या समाजातील भाषकांमध्ये आढळून आला आहे. या शब्दाचे डवनं, डवला, डोवी इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

भांडं हा शब्द सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक, नांदेड, अमरावती, वर्धा या जिल्ह्यात प्रामुख्याने ब्राह्मण, मराठा, कुणबी, माळी, सुतार या समाजात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे.

येळणी हा शब्द लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात तुरळक प्रमाणात दिसून आला आहे.

दुधभांडं हा शब्द वाशिम आणि अमरावती जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळून येतो. या शब्दाचे दुधभांडा, दुधप्याला इ. भेद दिसून येतात.

पंचंपात्र हा शब्द नांदेड आणि औरंगाबाद या जिल्ह्यात तर रामपात्र हा शब्द वर्धा जिल्ह्यात आढळून आला आहे.

मग्गा नाशिक, नांदेड, वर्धा या जिल्ह्यात अधिक आढळतो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील लातूर, हिंगोली जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. या शब्दाचे मग्गा, मग, मघा, मगा इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

तांब्या हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिक प्रमाणात दिसून येतो. उर्वरित महाराष्ट्रात कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, पुणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, अमरावती, बुलढाणा, नांदेड, लातूर, या जिल्ह्यात तुरळक प्रमाणात आढळतो. तंबालु, तांब्यो, ताम्यो, तांबुलं, तांटोली इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळते.

टमरेल हा शब्द धुळे जिल्ह्यात, टमरू हा शब्द जळगाव जिल्ह्यात, टोप हा शब्द पालघर जिल्ह्यात, तर टोपणो हा शब्द नंदुरबार जिल्ह्यात आढळून आला आहे. tumbler या शब्दाशी साम्य असलेला मराठीमध्ये टमरेल हा शब्द रूढ झाला आहे. इंग्रजीत tumbler चा अर्थ Oxford Dictionary मध्ये ‘a glass for drinking out of, with a flat bottom, straight sides, and no handle or stem’ असा अर्थ दिला आहे.

टिल्ली/टिल्लु हे शब्द अमरावती जिल्ह्यात आढळून आला आहे.

बटकी हा शब्द नांदेड, धुळे जिल्ह्यात चांभार आणि गोंदिया जिल्ह्यात राजगोंड समाजात अतितुरळक प्रमाणात आढळतो. तर औरंगाबाद जिल्ह्यातही बाटगी हा शब्द दिसून आला आहे. बुटलं हा शब्द लातूर आणि जळगाव जिल्ह्यात मराठा समाजात, बुट्कुला हा अहमदनगर जिल्ह्यातील धनगर समाजात, बटला सोलापूर जिल्ह्यातील धनगर समाजात तर बुडगं हा शब्द परभणी जिल्ह्यात आढळून आला आहे.

घगरा हा शब्द वर्धा जिल्ह्यात आढळून आला असून चरवी हा शब्द सोलापूर जिल्ह्यात तर चरी हा शब्द जळगाव जिल्ह्यात आढळून आला आहे. तसेच गटला हा शब्द बुलढाणा जिल्ह्यात आणि गुळाम हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला आहे. तवेली हा शब्द अमरावती जिल्ह्यात आणि तुक्कस हा अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजात आढळून आला आहे.

भगुनं हा शब्द लातूर, धुळे, सातारा, नाशिक या जिल्ह्यात या शब्दाचा वापर दिसून आला आहे. अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणार्या भांड्याला भगुने म्हटले जाते. मात्र अपवादात्मक स्वरूपात पाणी पिण्याच्या भांड्याकरिता हा शब्द मिळाला आहे. याचे बगुनं, भउल, भगुना इ. ध्वन्यात्मक वैविध्य आढळले.

संदर्भ –

आपटे, वामन. १९८५ (पुनर्मुद्रित) संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी, दिल्ली: मोतीलाल बनारसीदास

विल्यम्स. मोनियर. १९६०. संस्कृत-इंग्लिश डिक्शनरी, ऑक्सफर्ड.