मराठीच्ा बोलींचे स्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

चालू दिवस‌, येणारा दिवस, उलटून गेलेला दिवस

डाउनलोड चालू दिवस‌, येणारा दिवस, उलटून गेलेला दिवस

नोंदीत दिलेल्या पर्यायी शब्दांचा क्रम हा त्यांच्या एकूण सर्वेक्षणातील वारंवारितेनुसार दिलेला आहे याची नोंद घ्यावी.

भाषेतील कालनिदर्शक संकल्पनांपैकी दिवसाचे दर्शक असणाऱ्या ‘चालू दिवस’, ‘येणारा दिवस’ आणि ‘उलटून गेलेला दिवस’ या संकल्पनांसाठी प्रमाण मराठीमध्ये अनुक्रमे आज, उद्या आणि काल असा तिहेरी भेद आढळून येतो. मात्र महाराष्ट्राच्या पश्चिमोत्तर आणि उत्तर दिशेकडील जिल्ह्यांना गुजराती, तसेच हिंदी भाषिक राज्यांच्या सीमा जोडलेल्या आहेत. तसेच या भौगोलिक प्रदेशांत विविध आदिवासी समूह बऱ्याच वर्षांपासून स्थिर झाले आहेत. हिंदी भाषेमध्ये होऊन गेलेला दिवस आणि येणारा दिवस याकरता वेगवेगळे शब्द नाहीत. येथे या संकल्पनांकरता केवळ दुहेरी भेद दिसतो. भाषा सान्निध्यामुळे वर उल्लेखलेल्या प्रदेशामधील ठराविक जिल्हे हिंदी भाषेप्रमाणे वैविध्य दर्शवतात.

चालू दिवसासाठी सर्वत्र ‘आज़’ हा एकच शब्द सापडतो.

‘येणाऱ्या दिवसा’साठी प्रामुख्याने उद्या हाच शब्द आहे. उद्या या शब्दाचे उंद्या, उद्ये, उंद्ये, उंदी, उदे, उद्याला इ. ध्वन्यात्मक वैविध्य पहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या येथे उद्यासोबतच येतलो आणि फाल्या हे शब्द आढळतात. फाल्या/फाल्यार हा शब्द सिंधुदुर्ग जिल्यातील सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यात ख्रिश्चन समाजात जास्त प्रमाणात आढळतो. त्याच बरोबर हिंदू समाजातील भंडारी, मराठा आणि महार समाजातही तुरळक प्रमाणात आढळतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा राज्याच्या सीमेलगत असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील आयी या गावात येतलो हा शब्द येणारा दिवस या अर्थी वापरात असल्याचे आढळते. कल हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम समाज, जळगाव जिल्ह्यातील तेली समाज आणि अमरावती जिल्ह्यातील कोरकू समाजात आढळतो. पालघर जिल्यात उद्या शब्दासोबतंच परम, पहाय, आवतोकाल, काल, उंड्या (उंद्या) हे शब्द सापडतात. धुळे जिल्हा, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका आणि सटाणा तालुका, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, सोयगाव आणि पैठण तालुका, अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर आणि धारणी तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव-जामोद आणि शेगाव तालुका या ठिकाणी उद्या या शब्दासोबतच सकाळ, सकाय, सकाव, हाकाल, कालदी,कालदिन, काल हे शब्दवैविध्य सापडते. या शब्दाचे सकाय, सकाइ, सकाळ, सकाव, सकार, हाकाल, सकाल, सकारे, सकाळी, साकाल, सवार, सकारी इ ध्वन्यात्मक वैविध्य आढळून आले. हेच शब्द रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका, त्याचप्रमाणे महाड तालुका येथील कातकरी भाषकदेखील वापरतात. सकाळी हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील राजगोंड आणि फुलमाळी समाजात, औरंगाबादमधील भिल्ल समाजात वापरला गेला आहे. तर सकारी हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील बिंजेवार आणि हळबा या समाजात, नागपूर जिल्ह्यातील कोष्टी समाजात आणि औरंगाबाद जिल्ह्यातील चमारू समाजात वापरला गेला आहे. हाकाल हा शब्द नंदुरबार जिल्ह्यातील भिल्ल समाजात सापडला.

‘होऊन गेलेला दिवस’ या संकल्पनेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल हा शब्द आढळतो. याबाबतीत महत्वाची नोंद अशी की वर नोंदवलेल्या भौगोलिक प्रदेशांमध्ये ‘होऊन गेलेल्या दिवसा’ साठीही सकाळ, सकाय, सकाव, कालदी, कालदिन, काल, कालदिस हे त्या प्रदेशांत येणाऱ्या दिवसासाठी रूढ असणारे शब्दच सापडतात. कालदिन हा शब्द उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या मालेगाव तालुक्यात आढळतो. कालदिस हा शब्द रायगड, पालघर आणि पुण्याच्या मुळशी तालुक्यातील कातकरी समाजात आढळतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव आणि सटाना तालुक्यातील मराठा, सुतार आणि शिंपी समाजातील अहिराणी भाषक तसेच सुरगणा तालुक्यातील कोकणा समाज व महादेव कोळी समाजातील कोकणा भाषा जाणणार्‍या लोकांमध्ये या शब्दाचा वापर दिसून येतो. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, पैठण आणि सोयगाव तालुक्यातील आणि जालना जिल्ह्यातील धावेडी गावातील भिल्ल समाजातही हा शब्द आढळतो. धुळे जिल्ह्याच्या धुळे व साक्री तालुक्यातील वाणी समाज आणि साक्री तालुक्यातील भिल्ल व महार समाजात हा शब्द आढळून आला आहे. कालीस हा शब्द पालघरच्या वसई तालुक्यातील वारली आणि ख्रिश्चन या समाजात आढळतो. या शिवाय गेलेल्या दिवसासाठी कल हा शब्द महाराष्ट्रात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अमरावती, नागपूर आणि जळगाव, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये तुरळक प्रमाणात आढळतो. हा शब्द नोंदवणार्‍या जवळ-जवळ सर्वच लोकांना हिंदी बोलता येते तर काही भाषक हे मुस्लिम समाजातील आहे. काली हा शब्द गडचिरोलीच्या कोर्ची तालुक्यातील कवर आणि गोंड समाजात आढळतो. तसेच कल, माकदी, कोलीन हे तिन्ही शब्द अमरावतीच्या धारणी तालुक्यातील कोरकू समाजात दिसून येतात. परम/पहाय हे शब्द पालघर जिल्ह्यातील वारली समाजात दिसून येतात. तर आवतोकाल हा शब्द पालघर जिल्ह्यातील धोदी (धोडिया) समाजात आढळून आला आहे. आम्या हा शब्द रायगडच्या मुरुड तालुक्यात इंडियन ख्रिश्चन समाजात आढळतो. यांची मातृभाषा पोर्तुगीज आहे. वहाणे/वाहाने हे शब्द जळगाव जिल्ह्यातील पावरा समाजात दिसून येतात. गडचिरोलीच्या कोर्ची तालुक्यातील मोहगावचे कवर आणि गोंड समाजातील लोक काली हा शब्द येणार्‍या दिवसासाठी वापरतात. गेलेल्या दिवसाला मागचा दिवस, गेल्या दिवशी, आदला दिवस, गयुचो दहाडो, पाठीमागना दिवस असे शब्द नंदुरबार, जळगाव, आणि जालना या जिल्ह्यांत आढळून आले. त्याबरोबरच सकाळ हा शब्द नंदुरबार जिल्ह्यात आणि सामोर हा शब्द गोंदिया जिल्ह्यात अपवादात्मक स्वरूपात वापरला गेला आहे. निन्ने हा शब्द गोंदिया जिल्ह्यातील राजगोंड समाजात आढळतो.